मुंबई: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी २५ एकर जमीन देण्यासंदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर ११ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.उच्च न्यायालय प्रशासनाने १४ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी बीकेसीमध्ये २५ एकर जागेचा प्रस्ताव पाठवला. शिवाय याच परिसराच्या आसपास अतिरिक्त २५ एकर जागा, अशी मिळून ५० एकर जागा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने या प्रस्तावावर राज्य सरकारला ११ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. ऐतिहासिक वारशाच्या श्रेणी- एकमध्ये येणाऱ्या उच्च न्यायालायाच्या फोर्ट येथील इमारतीची जागा कमी पडू लागली आहे. १८७१ मध्ये अवघ्या १५ न्यायाधीशांसाठी बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक इमारत १८७८ मध्ये पूर्ण करण्यात आली. गेले १३५ वर्षे न्यायाधीशांची संख्या वाढत आहे. २००७ मध्ये न्यायाधीशांची संख्या ७५ वर गेली आहे. आता लवकरच न्यायाधीशांची क्षमता ९४ वर जाणार आहे. त्यामुळे नव्या जागेचा प्राध्यानाने विचार होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित जागेबाबत निर्णय घ्या
By admin | Published: October 16, 2015 3:29 AM