ठरलं! ‘पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 05:54 AM2019-06-10T05:54:55+5:302019-06-10T05:56:32+5:30
भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक घेतली.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी निश्चित होणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) दिल्लीत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत असलेल्या कोअर समितीच्या बैठकीसाठी ते आले होते.
भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, मंत्रीमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी आदींच्या बाबतीत अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. ‘आम्ही पूर्णपणे विधानसभा ‘निवडणुकीच्या मोड’मध्ये आलो आहोत. त्यामुळे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यात काही आवश्यक बदल करावे लागणार आहेत. प्रशासन अधिक गतीमान करण्याच्या दृष्टीनेही काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपमधील ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार रावसाहेब दानवे यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार, अशी चर्चा होती. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात संपूर्ण देशाचे वेळापत्रक निश्चित होत असते. त्याचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेईल.’ येत्या १३ व १४ जूनला प्रदेशाध्यक्षांच्या बदलासंदर्भात दिल्लीत केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी दानवेंच्या बाबतीत चित्र स्पष्ट होईल, असे कळते. आजच्या बैठकीला भाजपचे केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, आशिष शेलार, व्ही. वेणुगोपाल यांची उपस्थिती होती. भाजप मुख्यालयात जाण्यापूर्वी नवीन महाराष्ट्र सदन येथे कोअर समितीची बैठक झाली.