वाहतूक सेवकांच्या नियुक्तीचा निर्णय
By admin | Published: December 23, 2016 03:52 AM2016-12-23T03:52:26+5:302016-12-23T03:52:26+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या स्थानकांचे काम ठिकठिकाणी सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी ठिकठिकाणी
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या स्थानकांचे काम ठिकठिकाणी सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी ठिकठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्समुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूककोंडीत भर पडत आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी १ हजार ५०० वाहतूक सेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घेतला आहे.
मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी नुकतीच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यात बैठक झाली. बैठकीत मेट्रो-३ या भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान १ हजार ५०० वाहतूक सेवक नियुक्त करण्यासह इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. मेट्रो-३ च्या बांधकामादरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी हे वाहतूक सेवक सातही पॅकेजमध्ये तैनात राहतील. वाहतूक व्यवस्थापन आराखड्यांतर्गत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबई वाहतूक पोलिसांना वॉकी-टॉकी आणि चार हजार दिशादर्शक फलक उपलब्ध करून देणार आहे. विशेषत: या बांधकामादरम्यान वाहतूककोंडी होणार नाही; याची खबरदारी हे वाहतूक सेवक घेणार आहेत. (प्रतिनिधी)