Join us

बूस्टर डोस देण्याबाबत लवकरच निर्णय; तूर्तास लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:56 AM

देशासह राज्यातही आता कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाच्या मूळ रूपात जनुकीय बदल होण्याचा धोका कायम आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : देशासह राज्यातही आता कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाच्या मूळ रूपात जनुकीय बदल होण्याचा धोका कायम आहे. भविष्यात पुन्हा एकदा या संसर्गाच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे  प्रतिबंधक उपाय म्हणून लवकरच बूस्टर डोसवर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे. याविषयी डॉ. जोशी यांच्याशी साधलेला संवाद...

बूस्टर डोस म्हणजे नेमके काय?

एखाद्या विशिष्ट विषाणूविरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक असतो. त्याला लसीचा बूस्टर डोस असे म्हणतात. जी लस पूर्वीच एखाद्या व्यक्तीने घेतली आहे, बूस्टर डोस त्याच्या शरीरात अधिक प्रतिपिंडे निर्माण करतो.

कोणत्या गटाला याकरिता प्राधान्य देण्यात येईल?

ज्यांनी जानेवारीत लस घेतली होती व त्यांच्यातील ॲण्टीबॉडी आता कमी झाल्या असतील, त्यांनी तिसरी मात्रा घ्यायला हवी. कोरोना संसर्गानंतर आणि कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या ॲण्टीबॉडीज नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ राहतात.  विशेषत्वाने आरोग्य सेवेत, रुग्णांच्या संपर्कात आहेत अशा डॉक्टर व इतरांनी बूस्टर डोस घ्यायला हवा.

रुग्णनिदान कमी झाल्याने बेफिकिरी वाढली आहे, याबद्दल काय निरीक्षण आहे?

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, ही चांगली गोष्ट असली तरी त्याचसोबत लोकांची कोरोना नियमांविषयीची बेफिकिरी वाढताना दिसत आहे. कोरोना गेला असे लोकांना वाटल्यामुळे गावोगावच्या जत्रा सुरू झाल्या होत्या, शहरातही लोक बेफिकिरीने गर्दी करू लागले होते. लस घेण्याविषयी उदासीन झाले होते.

आताही कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी ओसरल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत लोक टाळाटाळ करीत आहेत. सरकार लोकांना दोन्ही डोस घेण्याचे आवाहन करीत आहे, पण बरेच लोक त्याकडे आता कोरोना गेला म्हणून दुर्लक्ष करीत आहेत. सरकारच्या प्रयत्नांना लोकांचे सहकार्य मिळण्याची गरज असते, तरच कुठलीही उपाययोजना यशस्वी होऊ शकते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस