Join us

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय म्हणजे 'चटावरचे श्राद्ध' उरकण्यासारखे !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:26 PM

थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला.परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  हे मागे कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले व आता कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणात ठाकरे सरकारकडून 'चटावरचे श्राद्ध' उरकण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरिता बोलावलेल्या बैठकीनंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या अहवालातील शिफारसी माध्यमांसमोर जाहिर केल्या, यात घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या शिफारसीचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली असून, कुलगुरूंना देण्यात आलेल्या पत्रामध्ये सुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाल्याने, एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू असून या संदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपालांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीत तक्रार केली आहे, असे आमदार भातखळकर म्हणाले. तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षा घेताना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावरच परिक्षा पार पाडाव्यात अशी मागणी सुद्धा राज्यपालांकडे केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रराज्य सरकारकोरोना वायरस बातम्या