Join us

निकाल ठरला, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ३०:३०:४० सूत्राने करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 7:18 AM

सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करणार

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून, मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बारावी निकालाची मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तब्बल महिनाभराने म्हणजेच शुक्रवारी जाहीर केली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.  हा निकाल कनिष्ठ महाविद्यालयाने वर्षभर घेतलेल्या विषयनिहाय ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापनानुसार अवलंबून असेल. यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून, त्यानुसार आराखडा आणि  गुणांचा ताळमेळ बसवला जाणार आहे. 

टॅग्स :मुंबईबारावी निकाल