विधि महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचा निर्णय विद्यापीठांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:53 AM2020-06-11T06:53:16+5:302020-06-11T06:53:40+5:30
इतर वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात मिळणार प्रवेश
मुंबई : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल आॅफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध विधि महाविद्यालयांमध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना (अंतिम वर्ष वगळता) यंदा परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांना परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल. मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याचा निर्णय सर्वस्वी विद्यापीठांनी घ्यायचा आहे, असे यासंदर्भात जारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
बार काउन्सिल आॅफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकानुसार विधिच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मागील वर्षाचे गुण व चालू वर्षाचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण याआधारे प्रमोट केले जाईल. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना येथे ही लागू असतील.
महाविद्यालये सुरू झाल्यावर ज्या शैक्षणिक संस्थांना पुढच्या वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे, त्यांची परीक्षा ते ठराविक कालमर्यादेत घेऊ शकतील. विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाला नाही, तर त्याला पुन्हा डिग्री पूर्ण होईपर्यंत एक संधी आणखी मिळेल. मात्र अंतिम सत्राची परीक्षा झाल्यावरच विद्यार्थ्याला विधि शाखेची पदवी दिली जाईल.
विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर
बार काउन्सिल आॅफ इंडियाच्या या निर्णयाला अनेक विद्यार्थ्यांनी विरोध
करत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर हा परीक्षांचा तिढा सोडवावा, अशी मागणी स्टुडण्ट कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिन पवार यांनी केली आहे.