Join us

विकास नियंत्रण नियमावलीत सूट देण्याचा निर्णय ऐतिहासिक - पर्यटन मंत्री जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 10:22 PM

राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने विकास नियंत्रण नियमावलीत सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. 

मुंबई, दि. 19 - राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने विकास नियंत्रण नियमावलीत सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यात तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेल्स, मेगा टुरीझम प्रोजेक्ट, अल्ट्रा मेगा टुरीझम प्रोजेक्ट, लार्ज टुरीझम युनिट यांच्या निर्मितीस चालना मिळणार असून त्या माध्यमातून रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्याच्या पर्यटन धोरण २०१६ मध्ये जाहीर करण्यात आल्यानुसार नगरविकास विभागाने आज सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले.   

मंत्री श्री. रावल म्हणाले की, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याच्या दृष्टीने राज्यातील नगरपालिकांपासून मोठ्या महानगरांपर्यंत मेगा टुरीझम प्रोजेक्ट, अल्ट्रा मेगा टुरीझम प्रोजेक्ट, लार्ज टुरीझम युनिट तसेच तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांच्या निर्मितीला प्रोत्साहनासाठी वाढीव एफएसआय देण्यासंदर्भात पर्यटन धोरण २०१६ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने निर्णय घेणे आवश्यक होते. त्यानुसार या विविध पर्यटन घटकांसह तारांकित हॉटेलांसाठी वाढीव एफएसआय देण्याच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय या विविध पर्यटन घटकांसह तीन तारांकित तसेच पंचतारांकित हॉटेलांच्या निर्मितीसाठी असलेली किमान भूखंडाची अटही शिथील करण्यात आली आहे. या पर्यटन घटकांना तसेच तीनतारांकित, पंचतारांकित हॉटेलांच्या निर्मितीसाठी असलेली रस्ता रुंदीच्या अटीबाबतही लवचिकता करुन ही अट शिथील करण्यात आली आहे. या सर्व निर्णयांमुळे छोट्या - मोठ्या शहरांमध्ये हॉटेल उद्योगास तसेच मेगा टुरीझम प्रोजेक्ट, अल्ट्रा मेगा टुरीझम प्रोजेक्ट, लार्ज टुरीझम युनिट यांच्या निर्मितीस प्रोत्साहन मिळणार असून त्यामाध्यमातून पर्यटन विकासास मोठी चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई