पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामिनावर २४ जूनला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:35 AM2019-06-22T04:35:57+5:302019-06-22T04:36:55+5:30
आत्महत्येप्रकरणी तीन डॉक्टर अटकेत
मुंबई : नायर रुग्णालयाची प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता लोखंडवाला यांच्या जामीन अर्जावरील निर्णय सत्र न्यायालयाने २४ जूनपर्यंत राखून ठेवला आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याने, सत्र न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या या तिन्ही डॉक्टरांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर लगेचच न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर, या तिन्ही आरोपींनी याविरोधात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
पायल तडवीने अनुसूचित जाती व जमातीच्या कोट्यातून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. यावरून तिच्या वरिष्ठ प्रशिक्षणार्थी डॉक्टर हेमंत आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता लोखंडवाला यांनी तिची छळवणूक केली. तिच्यावर जातिवाचक टिप्पणी केली. त्यांच्या छळाला कंटाळून तडवीने आत्महत्या केली, असा आरोप पोलिसांनी या तिघींवर केला आहे.
मात्र, या तिघींनीही पायल तडवीने अनुसूचित जाती व जमातीच्या कोट्यातून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे, तसेच पायल तडवी हिला आपण आत्महत्येस प्रवृत्त केलेले नाही. केवळ ती कर्तव्यात चुकारपणा करत असल्याने, तिची टर उडवित असल्याचे याबाबत माहिती देताना त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पोलिसांनी या तिघींच्या जामीन अर्जावर तीव्र आक्षेप घेतला. डॉ. पायल तडवीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली असणार. मात्र, या तिघींनी ती नष्ट केल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण तडवीने आत्महत्या केल्यानंतर, या तिघी सर्वात आधी तिच्या रूमवर गेल्या होत्या. त्यानंतर, पंख्याला लटकलेल्या तडवीला खाली उतरवून या तिघींनी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी लिफ्टजवळ नेले होते. त्यानंतर अन्य डॉक्टरांच्या मदतीने तिला लिफ्टमध्ये नेऊन त्या तिघीही पुन्हा तडवीच्या रूममध्ये गेल्या होत्या, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या तिघींनी त्यांच्याविरोधातील पुरावे नष्ट केले आणि त्या तपासास सहकार्य करत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
युक्तिवादानंतर निर्णय राखीव
आरोपी डॉक्टर असल्या, तरी पीडिताही डॉक्टर होती, याचा विचार करावा, असे सरकारी वकिलांनी म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने या तिघींच्याही जामिनावरील निर्णय २४ जूनपर्यंत राखून ठेवला.