Join us

आवश्यकतेनुसार लाॅकडाऊनचा निर्णय - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:08 AM

आवश्यकतेनुसार लाॅकडाऊनचा निर्णयमुख्यमंत्री; पात्र व्यक्तींना लस घेण्याचे केले आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाचा वाढता धोका ...

आवश्यकतेनुसार लाॅकडाऊनचा निर्णय

मुख्यमंत्री; पात्र व्यक्तींना लस घेण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन काही ठिकाणी कठोर लाॅकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला. येत्या एक-दोन दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. जिथे आवश्यकता भासेल तिथे कडक लाॅकडाऊन लागू केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी जे.जे. रुग्णालयात कोरोनावरील लस टोचून घेतली. यानंतर माध्यमांना सांगितले की, काही दिवसांपासून काेराेनाच्या संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही, तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाइलाजाने कडक लॉकडाऊन लागू केला जाईल. कदाचित पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनी बंधने पाळणे आवश्यक आहे.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अद्याप संसर्गाचा धोका टळला नाही. त्यामुळे लसीकरणासाठी जे पात्र असतील त्या सर्वांनी लस घ्यावी. मनात कोणतीही भीती, संभ्रम, किंतु-परंतु न बाळगता लसीकरणात सहभागी व्हावे. लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

* मुख्यमंत्र्यांनी घेतली लस

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, मीना पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही लस घेतली. या वेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.

----------------------