Join us

पुरातन वास्तु, पुतळ्यांच्या देखभालीसाठी नेमणार खासगी ठेकेदार, महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:05 AM

ब्रिटिशकालीन इमारती, पाणपाेई, वस्तूसंग्रहालय, स्वातंत्र्यसेनानींच्या पुतळ्यांमुळे या परिसराचे परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण आहे. देशाच्या व शहराच्या जडणघडणी या सर्वांचे मोठे योगदान आहे.

शेफाली परब - पंडित -

मुंबई: ‘बिझनेस हब’ अशी ओळख हाेत चाललेल्या दक्षिण मुंबईचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांमध्ये बदलला असला तरी येथील पुरातन वास्तू, पुतळे, स्मारके शहराच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. परंतु, योग्य देखभालीअभावी त्यांच्यावर धूळ चढली असून काही पुतळ्यांची दुरवस्था झाल्याने तज्ज्ञांमार्फत ऐतिहासिक परिसर व पुतळ्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्यांदाच खासगी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन इमारती, पाणपाेई, वस्तूसंग्रहालय, स्वातंत्र्यसेनानींच्या पुतळ्यांमुळे या परिसराचे परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण आहे. देशाच्या व शहराच्या जडणघडणी या सर्वांचे मोठे योगदान आहे. मात्र, आता केवळ जयंती व पुण्यतिथीला या पुतळ्यांना पुष्पहार वाहिले जातात. अन्य वेळेस दुर्लक्षित राहिलेल्या या  पुतळ्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे अशा १९ पुरातन वास्तू, परिसर व पुतळ्यांच्या नियमित सफाई, संवर्धनासाठी खासगी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव महिन्याभरात तयार होऊन स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत  पुतळे, परिसराची देखभाल स्थानिक विभागामार्फत केली जात होती. 

असे आहेत काही पुतळे, पुरातन वास्तूफ्लोरा फॉऊंटन, फिट्झगेराल्ड फाऊंटन, कोठारी प्याऊ, मॅडम कामा मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, महापालिका मार्गावरील फिरोजशहा मेहता यांचा पुतळा अशा १९ पुरातन पुतळे, वास्तूच्या देखभालीचे तीन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे.अशी घेणार पुतळ्यांची काळजी... पुरातन परिसर, पुतळे यांचे आवश्यकतेनुसार नूतनीकरण, परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी- पॉलिश करणे, रोषणाई करणे. गरजेच्या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवणे तसेच कारंजे चांगल्या स्थितीत नसल्यास त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी तीन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार असून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. म्हणून पडली ठेकेदाराची गरज.... दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाच्या चौकात सन १८६७ मध्ये उभारलेले ‘फिट्झगेराल्ड फाऊंटन’ चे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. या दुरुस्तीसाठी बराच काळ लागला, पण त्यानंतरही त्यात काही त्रुटी राहिल्याने महापालिकेला पुन्हा काम करावे लागले होते. तर कोठारी प्यूऊ याचीदेखील डागडुजी करण्यात आली होती. मात्र योग्य देखभाल होत नसल्याने या प्याऊची नियमित दुरुस्ती करावी लागत आहे.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनामुंबई