Join us

मलबार हिल जलाशयाचा निर्णय अंतिम अहवालानंतरच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:44 AM

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, २ सदस्यांची निरीक्षणे अंतिम अहवालातच.

मुंबई : मलबार हिल जलाशयाचा अंतरिम अहवाल पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना सोमवारी सादर करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करण्यात येईलच. मात्र, १५ दिवसांनी सादर होणाऱ्या अंतिम अहवालानंतरच जलशयासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अंतरिम अहवाल सादर झाल्यानंतर तज्ज्ञ समितीसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना ते बोलत होते.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या निर्णयासाठी ८ जणांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातील ४ सदस्यांनी आपला अंतरिम अहवाल आणि निरीक्षणे सादर केली आहेत. २ सदस्य आपली निरीक्षणे ही अंतिम अहवालातच देणार असल्याने त्यांचा यामध्ये सहभाग नव्हता. शिवाय पालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांची निरीक्षणे या अंतरिम अहवालात नोंदविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे निर्णयाची प्रतिक्षा आहे.

निरीक्षणाबाबत आणखी स्पष्टता :

जलाशयाच्या नोंदी आणि निरीक्षणाबाबत आणखी स्पष्टता येणार आहे. त्यामुळे जलाशयाचा निर्णयही तेव्हाच अंतिम करण्यात येईल, असे लोढा यांनी सांगितले.याशिवाय जलायशाच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी बाबत सर्व समावेशक अहवाल सादर होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे पालिकडेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जलाशयाच्या दुरुस्तीबाबत महत्त्वाची निरीक्षणे :

 टाकी १ सी चे छप्पर किरकोळ दुरुस्तीसाठी खाली करण्यात येऊ शकते. याची क्षमता ६.५ दशलक्ष लिटर इतकी आहे.

 २ ए या टाकीची लहान जागा ही पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा न आणता दुरुस्त करता येऊ शकणार आहे.

 जलाशयाच्या छताची संपूर्ण वॉटरप्रूफिंग करता येऊ शकणार आहे. यामुळे जलाशय अधिकाधिक काळ सुस्थितीत राहू शकणार आहे.

जलाशयातील ५ कप्प्यात किरकोळ दुरुस्ती :

जलाशयात वन ए, वन बी, वन सी आणि टू ए, टू बी असे एकूण पाच कप्पे आहेत. या सर्व कप्प्यांची पाहणी आता पूर्ण झाली आहे. त्यापैकी सर्व कप्पे अतिशय सुस्थितीत असून त्याच्या पुनर्बांधणीची अजिबातच गरज नसल्याचे मत अहवालात नमूद करण्यात आला आहे.

शिवाय या जलाशयात कुठेही आम्हाला गळती किंवा ओलावा देखील फारसा दिसला नाही. १३५ वर्षांपूर्वी बांधलेले हे जलाशय आजकालच्या बांधकामापेक्षा खूपच चांगल्या दर्जाचे असल्याचे मत पाहणीदरम्यान तज्ज्ञ समितीतील सदस्यांनी व्यक्त केले होते.

टॅग्स :मलबार हिलमंगलप्रभात लोढा