शीना बोरा हत्याप्रकरणी पीटर मुखर्जीच्या अर्जावरील निर्णय ठेवला राखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:15 AM2017-11-23T06:15:20+5:302017-11-23T06:15:29+5:30
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याने पोलिसांची केस डायरी मिळावी, यासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याने पोलिसांची केस डायरी मिळावी, यासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.
तपासाच्या संपूर्ण माहितीची नोंद पोलीस डायरीमध्ये केली जाते. शीना बोरा हत्या प्रकरणातील खार पोलिसांची केस डायरी सादर करावी, अशी विनंती करणारा अर्ज पीटर मुखर्जी याने विशेष सीबीआय न्यायालयापुढे केला होता. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला. पीटरने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.
पोलिसांनी श्यामवर राय याच्यावर आधी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी केस नोंदविली की शीनाच्या हत्येची केस नोंदविली, याची पडताळणी करण्यासाठी पीटरला खार पोलिसांची केस डायरी हवी आहे. आरोपीला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे. गुन्हा नोंदविल्यावर श्यामवर राय याने पोलिसांना दिलेल्या जबानीतील विसंगतता न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यासाठी डायरी हवी आहे, असा युक्तिवाद पीटरचे वकील श्रीकांत शिवडे यांनी केला.
‘तुम्हाला डायरी देणे, धोकादायक आहे की नाही, ही केस नाही. पण तुम्हाला तशी मागणी करण्याचा अधिकार आहे की नाही, हे ठरवणे महत्त्वाचे आहे,’ असे म्हणत न्या. प्रभुदेसाई यांनी पीटरच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला.