"मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय म्हणजे मागच्या दाराने बिल्डरला दिले आंदण"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:59 PM2021-10-08T17:59:20+5:302021-10-08T17:59:29+5:30
भाजपा आमदारांची सरकारवर टीका; गरीब मराठी माणसाला मुंबई घर मिळावे यासाठी १९६० साली गोरेगाव येथील १४३ एकर एवढ्या विस्तृत जागेवर घरे बांधण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरचा पुनर्विकास स्वतः म्हाडाने करावे असे न्यायालयाने सांगितले असताना सुद्धा व मोतीलाल नगरचा विकास आम्ही स्वतः करू अशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वल्गना केली होती. मात्र आता अपुऱ्या निधीचे कारण पुढे करत म्हाडाच्या नियंत्रणाखाली खाजगी विकासकाकडून पुनर्विकास केला जाईल असा निर्णय घेणे म्हणजे मागच्या दाराने खाजगी बिल्डरला आंदण देण्याचा निषेधार्ह प्रकार असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
गरीब मराठी माणसाला मुंबई घर मिळावे यासाठी १९६० साली गोरेगाव येथील १४३ एकर एवढ्या विस्तृत जागेवर घरे बांधण्यात आली. या परिसराचा पुनर्विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी व स्थानिक रहिवासी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलन व न्यायालयीन लढाई लढत आहेत. जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न अशी ओळख असलेल्या मोतीलाल नगरच्या सर्वसमावेशक पुनर्विकासाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून मात्र वारंवार खोडा घालण्यात आला आहे. न्यायालयाने मोतीलाल नगरचा विकास स्वतः म्हाडाने करावा असे स्पष्टपणे सांगितले असताना सुद्धा म्हाडा कडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.
मुळात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून म्हाडा, सिडको यांचे प्रकल्प अपूर्ण ठेऊन त्यांचा निधी इतरत्र वळविण्याचा सपाटा लावला आहे. समृद्धी महामार्गाचे १००० कोटी रुपये अद्याप म्हाडाला परत करण्यात आलेले नाहीत, ते पैसे म्हाडाला परत करून त्यातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास करावा, मूळ रहिवाशींना मोफत घरे बांधून द्यावीत व शिल्लक जागेत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सामान्य मराठी माणसासाठी घरे बांधावी अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मोतीलाल नगर च्या पुनर्विकासाचा आज घेण्यात आलेल्या निर्णयाला भारतीय जनता पार्टी तीव्र विरोध करेल व जो पर्यंत मोतीलाल नगरचा सर्वसमावेशक विकास होणार नाही तोपर्यंत आमची लढाई अशीच सुरु राहील असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.