Coronavirus : ३ मेनंतर परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:21 AM2020-04-27T06:21:07+5:302020-04-27T06:21:33+5:30
शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत. ३ मेनंतर त्या-त्या भागातील परिस्थिती पाहून लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिलनंतर काही व्यवहार सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे. शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत. काही जिल्ह्यांत स्थितीचा अभ्यास करून तेथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई व पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही. ८० टक्के लोकांमध्ये विषाणूची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
>घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन
राज्यात सर्व धर्मीयांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत. राज्यातील मुस्लीम बांधवांनी रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र नमाज न अदा करता, ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
>पोलिसांच्या कुटुंबांना सर्व मदत करणार
कोरोना संसर्गाच्या संकटात राज्यातील पोलीस कुटुंबांपासून दूर राहून दिवसरात्र सेवा देत आहेत, परंतु दुर्दैवाने दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन या संकटाच्या स्थितीत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.