रिक्षा-टॅक्सीच्या टपावरील दिव्यांचा निर्णय प्रवाशांच्या हिताचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:46 AM2020-01-23T02:46:52+5:302020-01-23T02:48:46+5:30

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता हिरवा, पांढरा आणि लाल असे तीन रंगांचे दिवे लावण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

The decision on the rickshaw-taxi stage is in the interest of the passengers | रिक्षा-टॅक्सीच्या टपावरील दिव्यांचा निर्णय प्रवाशांच्या हिताचा

रिक्षा-टॅक्सीच्या टपावरील दिव्यांचा निर्णय प्रवाशांच्या हिताचा

googlenewsNext

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता हिरवा, पांढरा आणि लाल असे तीन रंगांचे दिवे लावण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सोयीचा आहे, पण त्याची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे. रिक्षा-टॅक्सी रिकामी असूनही भाडे नाकारल्यास किंवा नियमांचा भंग केल्यास तक्रार कुठे करावी, त्याचे निराकरण किती दिवसात होणार यांची नियमावली तयार करणे गरजेचे आहे. या निर्णयाला मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने दर्शविलेला विरोध चुकीचा आहे. त्यांनी प्रवाशांना सुविधा देण्यास पुढाकार घ्यायला हवा. ही सेवा प्रवाशांसाठी उपकारक आहे, असे स्पष्ट मत ‘लोकमत’च्या वाचकांनी प्रवासी कट्टा या व्यासपीठावर मांडले. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा धांडोळा...



दिव्यांपेक्षा मोबाइल अ‍ॅप बनवावे!
हे बदल करण्यापेक्षा उबेर, ओलासारखेच सर्व टॅक्सी मालकांचे मोबाइल अ‍ॅप बनवून टॅक्सी स्टँड तयार करावेत. तसेच अशा स्टँडवर गाडी उभी असल्यावर प्रवाशाने सांगेल तिथे गेलेच पाहिजे. तसेच हे स्टँड सार्वजनिक ठिकाण असले पाहिजेत. बदल घडेल असे म्हणणे म्हणजे सध्याची स्थिती खराब आहे असे म्हणणे चुकीचे वाटते, कारण मुंबईत फिरत असताना फार कमी चालक जाण्यास तयार नसतात, त्याऐवजी ओला, उबेरसारखेच सर्व टॅक्सीचालकांनी एकत्र यावे, परिवहन खात्याने त्यांना अ‍ॅप बनवून द्यावे, जेणेकरून जिथे प्रवाशांना वरील दोन्ही सुविधेसह ही जुनी सुविधा नवीन रूपात उपलब्ध होईल.
- बाळासाहेब लेंगरे, सदस्य, प्राणी कल्याण मंडळ महाराष्ट्र

निर्णयाचे दूरगामी परिणाम सर्वांच्याच फायद्याचे
मुंबईत प्रवास करताना टॅक्सी नेहमीच सोयीचे वाहतूक माध्यम आहे. मात्र अनेक प्रवाशांचे या टॅक्सीसेवेबद्दल फार चांगले मत व अनुभव नाहीत, हेही तितकेच खरे आहे. प्रवाशांना टॅक्सीला हात करून टॅक्सी थांबवावी लागते. अनेकदा टॅक्सी रिकामी नसेल तरी लोक टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी टॅक्सी रिकामी असेल तरी टॅक्सीचालक आपल्याला घेऊन जाण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे चालकांशी नेहमीच वाद होतात. मात्र परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगांचे दिवे लावण्याचा घेतलेला निर्णय प्रवासी हिताचाच आहे. यामुळे टॅक्सी आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. टॅक्सी युनियनने या निर्णयास विरोध दर्शविला असला तरी प्रवाशांच्या दृष्टीने या लाभकारी निर्णयाचे दूरगामी परिणाम सर्वांच्याच हिताचे व शिस्तीचे ठरतील एवढे नक्की.
- वैभव मोहन पाटील, घणसोली

अंमलबजावणीची जबाबदारी ठरवावी!
नजरेस पडणाऱ्या टॅक्सीमध्ये प्रवासी आहेत किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी टॅक्सींवर तीन रंगांचे दिवे बसवण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. टॅक्सीमेन युनियनने वाहतूक विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. वास्तविक प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सीसेवा सुरू केली आहे. टॅक्सी चालविणे हा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय म्हणून निवडल्यावर त्यातील व्यावसायिकांनी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे स्वाभाविक असते, त्याव्यतिरिक्त इतर अटी, शर्ती असू नयेत. सुरुवातीस या नव्या योजनेस विरोध होणे अपेक्षित आहे. त्यावर तोडगे निघतील, मात्र तांत्रिक बाबी लक्षात घेताना टपावरील दिवा स्वयंचलित किंवा टॅक्सीचालक संचलित असणार याचे स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. टॅक्सी, रिक्षाचालक प्रवाशांना नेहमीच वेठीस धरत असतात. भाडे नाकारणे, मीटर्समध्ये फेरफार करणे, ज्येष्ठांशी, महिलांशी वाद घालणे, जादा भाडे आकारणे, तसेच सणासुदीला, पावसाळ्यात प्रवाशांची अडवणूक, फसवणूक करणे हे प्रकार नेहमीच चालू असतात. त्यावर परिवहन विभाग, पोलीस खाते ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे हिरवा दिवा दर्शविल्यानंतर टॅक्सीचालकाने भाडे नाकारल्यास त्याची दखल कोण घेणार आणि त्याच्यावर काय कारवाई होणार, यावर या निर्णयाचे फायदे-तोटे अवलंबून आहेत. नाहीतर कागदोपत्री सोयी फार, प्रवाशांनी सोसायचा जुनाच भार! अशी गत व्हायची. - राजन पांजरी, जोगेश्वरी

चालकांच्या मानसिकतेत बदल महत्त्वाचा
रिक्षा, टॅक्सीचालक यांची मनमानी, प्रवाशांशी होणारी वादावादी हे जणू अतूट समीकरणच बनले आहे. कितीही कायदे करा, शिस्त लावण्याचा प्रयत्न करा, मात्र प्रवाशांना त्रास होतो तो होतोच. सध्या मीटरमधला घोळ गाजतो आहे. पण कुणालाही धाक उरला नाही. आता टॅक्सी, रिक्षावर दिवे लावण्याचे नियोजन होत आहे, जेणेकरून प्रवाशांना टॅक्सीची उपलब्धता समजणार आहे. पण त्याचा कितपत उपयोग होईल याबाबत साशंकताच आहे. मुळात टॅक्सी, रिक्षा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी आहे, ना प्रवाशांची लूटमार करण्याचे साधन, या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
- अनंत बोरसे, शहापूर

दिव्यांबाबत नियमावली जाहीर करा!
नव्या योजना ग्राहकहिताकरिता म्हणून राबविल्या जाण्याऐवजी सर्वांकडून त्या राबविण्याबाबत प्रामाणिकपणाचा अभावच आढळतो. टॅक्सीचालक, त्यांची युनियन्स यांची मनमानी, हक्क यावर गदा येईल म्हणून ते विरोधात असतात. साहजिकच दिव्यांच्या बाबतीतही अशा प्रकारची चालढकल होण्याची शक्यता आहे. दिवे अ‍ॅटोमॅटिक की टॅक्सीचालक बदलणार याचे स्पष्टीकरण व्हावे. टॅक्सीचालकाने दिवे बंदच ठेवणे, टॅक्सी रिकामी असूनही भाड्यास नकार दिल्यास प्रवाशांनी कोठे तक्रार करावी, तक्रारींचे निवारण कोण/ किती दिवसांत करणार याची संपूर्ण नियमावली जाहीर केल्यास सर्वांच्याच हिताचे ठरेल. तसेच भविष्यात टपावरील बिघडणारे दिवे, मीटर्समधील घोळ, त्यांची अचूकता पोलिसांकडून नियमित तपासली जावी.
- स्नेहा राज, गोरेगाव

टॅक्सी सेवेत काहीच फरक पडणार नाही
टॅक्सीवर तीन रंगांच्या दिव्यांमुळे सोयीस्कर प्रवास करता येईल. टॅक्सीचालक प्रवाशांसोबत कायम सौजन्याने वागतील. सौजन्य सप्ताह, सौजन्य पंधरवडा असल्या गोष्टी करणार नाहीत. भाडे नाकारण्याचे कोणतेही कारण प्रवाशांना सांगणार नाहीत, असा भाबडा समज वाहतूक विभागाचा झाला आहे. पण टॅक्सीचालकाच्या हाती तीन दिव्यांचे बटण आहे. त्यामुळे टॅक्सीवर तीन रंगांचे दिवे लावल्याने टॅक्सी सेवेत काहीच फरक पडणार नाही. - अशोक पोहेकर, उल्हासनगर

निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचाच!
वाहतूक शाखेने प्रत्येक टॅक्सीच्या टपावर तीन दिवे लावण्याचा घेतलेला निर्णय हा प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचाच म्हणता येईल, कारण येणारी टॅक्सी रिकामी आहे की नाही हे प्रवाशांना कळणे शक्य होईल. पण तीन दिव्यांच्या नियमामुळे रिक्षा, टॅक्सीचालक अडचणीत सापडतील आणि युनियनला त्यांना सावरून घेणे अडचणीचे ठरणार आहे, हे लक्षात घेऊन प्रवाशांपेक्षा टॅक्सीचालकांना सहकार्याच्या दृष्टीने टॅक्सी युनियनने या गोष्टीस विरोध दर्शविला आहे.
- मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, डोंबिवली

टॅक्सी-रिक्षावाल्यांनी मुजोरपणा सोडावा
१ जानेवारीपासून नवीन नोंदणी झालेल्या टॅक्सींच्या टपावर तीन रंगांचे दिवे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. वास्तविक गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना अनेक वेळा रिकामी टॅक्सी मिळणे म्हणजे एक दिव्यच असते. कारण टॅक्सी, रिक्षा रिकामी असली तरी लांबचे भाडे नसेल तर चालक प्रवाशांना नकार देतात. पण तीन रंगांच्या नवीन नियमामुळे या मुजोरीला काही प्रमाणात आळा बसेल. परंतु जोपर्यंत टॅक्सी-रिक्षावाल्यांची अरेरावीची मानसिकता आणि मनोवृत्ती बदलत नाही, तोपर्यंत या नवीन नियमामुळे टॅक्सी सेवेत फारसा बदल होईल असे वाटत नाही.
- प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व)

टॅक्सीच्या टपावर कळणार ‘उपलब्धता’
प्रवाशांना अनेकदा रिक्षा, टॅक्सीचालकाकडून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी नकार दिला जातो. मात्र आता तीन रंगांच्या दिव्यांमुळे या त्रासातून सुटका होणार आहे. कुठली टॅक्सी-रिक्षा रिकामी आहे हे प्रवासी ग्राहकांना आता टॅक्सी-रिक्षाच्या टपावरील इंडिकेटरद्वारे कळणार आहे. पण सरकारने असे इंडिकेटर कोण बनविणार आधी निश्चित करावे, तसेच त्याची किंमत माफक असावी. त्याच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असावे, त्याची किंमत सर्वसामान्य टॅक्सीचालकांनाही परवडणारी हवी. ही सुविधा ग्राहक आणि वाहनधारक अशा दोघांच्याही दृष्टीने सोयीची ठरणार आहे.
- कमलाकर जाधव, बोरीवली पूर्व, मुंबई

असे बदल आवश्यक असतातच!

क्सी आणि रिक्षाच्या छतावर, दिवे बसवून, टॅक्सी, रिक्षा प्रवाशांना उपलब्ध आहे किंवा नाही हे प्रवाशांना कळू शकणार आहे. ही एक नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. रात्रीच्या वेळी, ही सुविधा उपयुक्त ठरेल. आजसुद्धा, मीटर फ्लॅगवरून टॅक्सी किंवा रिक्षा रिकामी आहे की नाही हे कळू शकते. परंतु ती जवळ येईपर्यंत, ते कळू शकत नाही. रात्री तर फारच अडचण होते. त्यादृष्टीने, ही सुविधा चांगली आहे. रिकामी असूनही चालक जर प्रवासी घेण्यासाठी तयार नसेल, तर त्याबद्दल तक्रार करणे शक्य असते. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अशा नव्या कल्पना आणाव्या लागतात.
- मोहन गद्रे, कांदिवली.

Web Title: The decision on the rickshaw-taxi stage is in the interest of the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.