लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार? ठाकरे सरकारकडून महत्त्वाचे संकेत
By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 01:51 PM2020-10-22T13:51:06+5:302020-10-22T13:53:49+5:30
mumbai local train: दोनच दिवसांपूर्वी महिलांना लोकल प्रवासाची परवानगी
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लोकलमधून महिलांना प्रवास कमी करण्याची मुभा नुकतीच देण्यात आली. मात्र इतर मुंबईकरांना आजही लोकल प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे लाखो मुंबईकर बस आणि इतर साधनांनी प्रवास करत आहेत. मात्र बसची संख्या कमी असल्यानं प्रवास तापदायक ठरत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबद्दल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील २-३ दिवस घेण्यात येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणाले. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वे दुर्गांनी आणली ‘जीवनवाहिनी’त जान, महिला प्रवाशांची लगबग वाढली
विजय वडेट्टीवारांनी काल राज्य सरकारमधील अधिकारी आणि रेल्वे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना वडेट्टीवारांनी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले. 'मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. सर्व संबंधित विभागांना आणि संस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,' असं वडेट्टीवार म्हणाले.
गेल्या मंगळवारपर्यंत (२० ऑक्टोबर) केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र बुधवारपासून (२१ ऑक्टोबर) महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मध्य आणि पश्चिम मार्गांवर महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली गेली. मात्र त्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवास करता येऊ शकेल.