Join us

राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय दहा दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 7:08 AM

उदय सामंत; विधि व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा होत असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू होण्याबद्दल संभ्रम कायम आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची खबरदारी घेऊन ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीमध्ये महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. शनिवारी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.उदय सामंत यांनी या फेसबुक लाइव्हद्वारे महाविद्यालये सुरू करणे, प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियेतील अडथळे आदी विषयांवर विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यास विद्यापीठातील वसतिगृहे, महाविद्यालयांची परिस्थिती, क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात आणलेल्या शैक्षणिक संस्था यांचा आढावा घेऊन, येत्या १० दिवसांत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय यांचाही त्यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान उल्लेख केला.

प्रवेशांना आता १५ जानेवारीपर्यंत मुदतविधि प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना फटका बसत असून प्रवेश होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. म्हणून येत्या मंगळवारपर्यंत विधि प्रवेशांना अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच लॉकडाऊनमुळे तंत्रशिक्षणाच्या पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशांमध्ये अनेक अडचणी आल्याने या सर्व प्रवेश प्रक्रियेस १५ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत शासकीय संगीत महाविद्यालयभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय मुंबईत सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीने केली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या महाविद्यालयासाठी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही आज त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :महाविद्यालयशाळाउदय सामंत