Join us

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय आठवडाभरात; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 2:59 AM

लोकमत लाइफस्टाइल आयकाॅन-२०२० पुरस्कार

मुंबई : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे काम सुरू होते. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील प्रत्यक्ष संवाद पुन्हा सुरू करण्याची वेळ आता आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली. ‘लोकमत लाइफस्टाइल आयकाॅन -२०२०’ हा सोहळा सहारा स्टार येथे पार पडला.

यावेळी सामंत यांच्यासह अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी, लागू बंधू मोतीवाले प्रा. लि.चे दिलीप लागू आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी कार्यरत व्यक्ती आणि संस्थांना यावेळी लाइफस्टाइल आयकाॅन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सामंत म्हणाले की, कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू होती. या कालावधीत देशात सर्वात चांगले ऑनलाइन शिक्षण महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्रात झाले. मुंबई-पुणेसारख्या शहरांना ऑनलाइन व्यवस्था नव्या नाहीत. दुर्गम भागात अडचणी येतील, असे वाटत होते. मात्र, गडचिरोली आणि चंद्रपुरात सर्वात चांगल्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण झाले. त्यामुळे या जिल्ह्यांत स्टुडिओ डाटा सेंटरसाठी  २५ कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. 

राज्यात खंडित झालेले पारंपरिक शिक्षण सुरू करण्याची वेळ आली आहे. लवकरच महाविद्यालये सुरू होणार असून, येत्या आठ-दहा दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महाविद्यालये सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. योग्य काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू होतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. तर, आगामी काळात बदललेली मुंबई लोकांना अनुभवता येईल, असा दावा पालकमंत्री आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केला. टोकियोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था उभारण्यात येत आहे. याशिवाय, मुंबईतील उड्डाणपुलांखाली उद्याने आणि सुशोभीकरण करण्यात येईल. मुंबईत प्रत्येक विभागात प्रायोगिक तत्त्वावर पाच शौचालये, दोन पूल, पाच वाहतूक बेटे आणि उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी २०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.  

टॅग्स :उदय सामंत