Join us

मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असताना केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक असल्याची टीका भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनामुळे लोकल बंद करून आज १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणाऱ्या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे, अशी टीका सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.

राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी तत्काळ लोकल सुरू करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

---------------------------------------------