मुंबईमुंबईकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होणार याची सर्वजण वाट पाहात आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईच्या लोकलबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. "लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. पुढील महिन्यात यावर निर्णय घेतला जाईल", असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल बंद आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता घटल्याने लोकल सेवा पूर्ववत होईल अशी चर्चा होती. याआधी १५ डिसेंबर आणि त्यानंतर १ जानेवारीपासून लोकल सुरू होण्याच्या चर्चेने जोर धरला होता. पण अजून याबाबतचा निर्णय झालेला नाही.
...तर सर्वांसाठी चालू होणार मुंबई लोकल; फॉलो करावा लागणार 'चेन्नई पॅटर्न'
अत्यावश्यक कर्मचारी आणि महिलांसाठी सध्या लोकल सेवा सुरू आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना अद्याप लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबईच्या लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होण्यासाठी लोकल खूप मोठं केंद्र ठरू शकतं. यामुळे लोकल सेवा पूर्ववत करण्याबाबत सरकारकडून अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकली जात आहेत.
दरम्यान, मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. तर नव्या वर्षात कोरोनाच्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतरच लोकल सरु करण्याचा विचार केला जाईल, असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले होते.