लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अन्य राज्यांमध्ये शाळांची घंटा वाजली तरी मुंबईत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याने दिवाळीनंतर मुंबईतील शाळा सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत सकारात्मकता दर्शवत त्यावेळीच्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून मुंबईतील शाळा बंद आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर मुंबईतील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. याबाबत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लहान मुलांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. मात्र, दिवाळीनंतर परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.