लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला असून या निर्णयाकडे पालक मात्र योग्य निर्णय म्हणून पाहत असल्याचे एका सर्वेक्षणातुन समोर आले आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील पालकांचे सर्वेक्षण जेल असता शिक्षण विभागाच्या या निर्णयाकडे ४६.६% पालक योग्य निर्णय म्हणून पाहत आहेत तर २६.% पालकांना हा निर्णय अयोग्य वाटत आहे.
दरम्यान २३ नोव्हेंबरपासून ५७% पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास लेखी परवानगी द्यायला तयार आहेत, तर ४३ % पालक अद्याप कोरोना संसर्गामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.२३ नोव्हेंबरपासून राज्यात सुरू होणाऱ्या शाळांच्या बाबतीत अद्याप पालक, शिक्षक संभ्रमात असल्याने शिक्षण विभागाकडून पालकांची, संघटनांची मते, सूचना मागवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कुर्ल्याच्या गांधी बालमंदिर येथील समुपदेशक व शिक्षक असणाऱ्या जयवंत कुलकर्णी यांनी आम्ही पालक बोलतोय या सर्वेक्षणातून पालकांच्या प्रतिक्रिया, मते, सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक पालकांच्या मनात अद्यापही कोरोना संसर्गाची भीती असल्याने ते मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत आणि त्याची कारणे ही या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. शाळेत गेल्यावर घोळक्यात कोरोना संसर्गाची भीती २६.३% पालकांना वाटत आहे तर काही पालकांना शाळा सॅनिटायझेशनची सुविधा पुरेपूर करतील असे वाटत नाही. २२% पालकांना यावर्षी मुलांना शिक्षण नाही झाल्यास चालणार आहे, पुढील वर्षीच बोर्ड परीक्षा द्यायची, लस येईपर्यंत धोका पत्करायचा नाही, संसर्ग झाल्यास आर्थिक खर्च पेलवणार नाही अशी मते व्यक्त करीत आहेत. १८.२% पालक आपल्या मुलांना लस येईपर्यंत शाळांमध्ये पठवणार नसल्याचे म्हणत आहेत.
यंदाची बोर्डाची परीक्षा द्यायची की नाही याबाबतीत ६५%हून अधिक पालक साशंक असून २१ .४% पालक परीक्षा देण्याच्या विरोधात आहेत तर ३३.७% पालकांचा अद्याप निर्णय झालेला नाही. ४४.९%पालक मात्र विद्यार्थ्यानी बोर्डाची परीक्षा द्यावी असे मत व्यक्त करीत आहेत.
पालकाची विद्यार्थ्यांना शाळांमध्ये न पाठवण्याची कारणे जाणून घेऊन त्यांचे योग्य समुपदेशन शिक्षकांनी , शिक्षण विभागाकडून व्हायला हवे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शनपर पावले उचलणे आवश्यक आहे- जयवंत कुलकर्णी, शिक्षक- समुपदेशक