नाशिकवरून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, तत्काळ सुनावणीस नकार
By दीप्ती देशमुख | Published: November 3, 2023 11:56 AM2023-11-03T11:56:46+5:302023-11-03T11:57:37+5:30
न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. मात्र, न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली.
नाशिकमध्ये दुष्काळी स्थिती असताना नाशिक व नगर धरणांमधील पाणी मराठवाड्याला सोडण्याच्या निर्णय महामंडळाने घेतला. हा निर्णय रद्द करावा व याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवयानी फरांदे यांनी न्यायालयात दाखल केली आहे.