Join us

सर्वांसाठी लोकलबाबत आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 3:15 AM

सध्या नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली असून, बुधवारी न्यायालयात सरकारकडून आपली भूमिका मांडण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारीच बैठक होणार आहे. रेल्वेबाबत काय निर्णय होतो याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

सध्या नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून लोकल बंद आहे. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवावगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रेल्वेच्या प्रवासी संघटनांनीही यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

...त्यानुसार उचलणार पुढचे पाऊलसर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता सरकार तात्काळ रेल्वे सुरू करेल याची शक्यता कमी आहे. रेल्वेने वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. सरकारचा निर्णय आल्यानंतर त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल.- वरिष्ठ रेल्वे अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :लोकलमुंबई