पोर्ट व कामगार हिताचे निर्णय कामगार संघटनांच्या सहकार्याने घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:32+5:302020-12-27T04:05:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या आव्हानात्मक काळात पोर्ट व कामगार हिताचे निर्णय घेताना कामगार संघटनांचे सहकार्य घेऊ, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या आव्हानात्मक काळात पोर्ट व कामगार हिताचे निर्णय घेताना कामगार संघटनांचे सहकार्य घेऊ, असे स्पष्ट उद्गार मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक प्रकाशन प्रसंगी काढले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या वतीने नुकतेच बॅलार्ड पिअर येथील पोर्ट भवनमध्ये २४व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२०चे प्रकाशन राजीव जलोटा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
राजीव जलोटा म्हणाले की, कामगारांनी पोर्ट ट्रस्ट कामगार अंक काढून, कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात ज्या कामगारांनी पोर्ट ट्रस्टचे चांगले काम करून पोर्ट ट्रस्टची उत्पादकता वाढविली, त्यांचा गुणगौरव करण्याची सूचना चांगली आहे. त्याचा आपण विचार करू. ज्येष्ठ कामगार नेते अॅड.एस. के. शेटये म्हणाले, डॉ.शांती पटेल यांच्या प्रेरणेने या अंकाची निर्मिती झाली असून, कदाचित कामगार विशेषांक काढणारी भारतातील आमची एकमेव कामगार संघटना असावी. मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज म्हणाले, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाला दरवर्षी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव म्हणाले, डॉ.शांती पटेल यांनी कामगारांना लिहिण्यासाठी कामगार व्यासपीठ निर्माण केले आहे. यावेळी युनियनचे दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, संदीप कदम, मनीष पाटील, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलीक तारी, संदीप चेरफळे उपस्थित होते.