लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाचा पाणबुडी बांधणी प्रकल्प पी-७५१ च्या महत्त्वाच्या टप्प्यात आता पुढच्या पिढीतील पाणबुड्यांचे तंत्रज्ञान आपण कोठून घेणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. यामध्ये ‘लार्सन अँड टुब्रो’ प्रबळ दावेदार म्हणून समोर आली असून, ती स्पेनची कंपनी नवांटियासोबत भागीदारीत आहे. दुसरी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स असून, ती जर्मन कंपनी थिसेनक्रुप मरीन सिस्टिम्ससोबत भागीदारीत आहे. अशा स्थितीत पाणबुड्या खरेदीबाबतचे निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे.
पी-७५१ प्रकल्पाअंतर्गत भारतीय नौदलाला पुढील पिढीच्या ६ पाणबुड्या मिळतील, ज्या उत्तम सेन्सर, शस्त्रांनी सुसज्ज असतील. बांधणी करार ३० वर्षांसाठी असेल. २०१९ मध्ये या प्रकल्पाची किंमत ४३००० कोटी रुपये होती. दोन्ही कंपन्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांचे परिक्षण झाले असून, सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीस याचे काम देण्यात येणार आहे.
नवांटियाचे आधुनिक तंत्रज्ञान
रशिया आणि कोरियाच्या कंपन्यांनी पी-७५१ साठी बोली लावण्यास नकार दिला होता. फ्रान्सकडे स्वतःची ‘एआयपीएस’ नाही. अशा परिस्थितीत लार्सन अँड टुब्रोने नवांटियाशी भागीदारी केली आणि नंतर हे प्रकरण स्पर्धेचा विषय बनले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवांटियाची चौथ्या पिढीतील ‘एआयपीएस’ जगातील सर्वांत आधुनिक आहे. पी-७५१ च्या तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही क्षमता वाढीची आवश्यकता नाही. स्पेनच्या नौदलाने त्यांच्या एस ८१ पाणबुड्यांवर ही यंत्रणा स्थापित करण्यास मान्यता दिली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय नौदलाला सर्वोत्तम उपलब्ध पर्यायांसह आपल्या ताफ्याला बळकट करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
जर्मन कंपनीतील कमतरता...
जर्मनीची थिसेनक्रुप मरीन सिस्टिम ही माझगाव डॉक शिपबिल्डर्ससह भागीदारीतील, निःसंशयपणे एक प्रस्थापित पाणबुडी निर्माता कंपनी आहे; परंतु त्यांनी जर्मन नौदलासारख्या २१२ पाणबुड्यांपैकी एका पाणबुडीवर क्षेत्रीय मूल्यमापन चाचण्या घेतल्या आहेत. ही पाणबुडी अधिक उथळ पाण्यात तैनात केली जाते, कारण जर्मन नौदलाचे उद्दिष्टच मुळी उथळ बाल्टिक समुद्राच्या भागाच्या संरक्षणाचे आहे. त्यामुळे या प्रकारच्या पाणबुड्यांवर बसवण्यात आलेली ‘एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टिम’ नौदलाच्या पी-७५१ पाणबुड्यांसाठी आवश्यक क्षमतेची नाही. त्यामुळे याचा फेरविचार व्हायला हवा, असे जाणकारांचे मत आहे.
प्रकल्प लांबणीवर
जर्मन कंपनीने विविध कारणांमुळे भारतीय भागीदारासोबत काम करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. याशिवाय या कंपनीने ग्रीस, तुर्की आणि पोर्तुगालबरोबरच्या पाणबुडी निर्यात प्रकल्पांमध्ये अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना केला आहे. जर्मनी कधीही भारताचा विश्वासार्ह मित्र राहिलेला नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. संरक्षण निर्यात आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत जर्मनीच्या कडक नियमांमुळे भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराचे अनेक प्रकल्पही लांबणीवर पडले आहेत.