एलएलएम परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करताना दुजाभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:58 AM2019-05-05T04:58:57+5:302019-05-05T04:59:17+5:30
एलएलएम सेमिस्टर १ च्या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल महिना उलटूनही जाहीर झालेला नाही. मात्र, राजकीय नेत्याच्या पीएचा पुनर्मूल्यांकन निकाल मात्र विद्यापीठाने अर्ज दाखल होताच चार दिवसांत दिला
मुंबई - एलएलएम सेमिस्टर १ च्या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल महिना उलटूनही जाहीर झालेला नाही. मात्र, राजकीय नेत्याच्या पीएचा पुनर्मूल्यांकन निकाल मात्र विद्यापीठाने अर्ज दाखल होताच चार दिवसांत दिला, असा आरोप करत दुजाभाव न करता परीक्षेचा निकाल तातडीने लावावा यासाठी अधिसभा सदस्य वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाला निवेदन दिले.
एलएलएम सेमिस्टर १ ची परीक्षा ३० जानेवारी २०१९ रोजी झाली. त्यानंतर २६ मार्चला निकाल घोषित झाला. नापास विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी परीक्षा विभागाकडे अर्ज केले. मात्र महिना उलटूनही त्यांचे निकाल अद्याप लागलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान एका राजकीय नेत्याच्या पीएने याच परीक्षेसाठी पुनर्मूल्यांकनाचा अर्ज परीक्षा विभागाकडे सादर केला होता. त्याचा निकाल विद्यापीठाने दिला. याबाबत अर्थसंकल्पी सिनेट बैठकीत परीक्षा विभागाला सिनेट सदस्यांनी खुलासा मागितला. मात्र परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक समाधानकारक उत्तर देऊ शकले नव्हते.
एलएलएम सेमिस्टर १ च्या विद्यार्थ्यांची केटीची परीक्षा ८ मे रोजी आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकन निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी तणावत आहेत. केटी परीक्षेआधी पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावावेत, अशी मागणी अधिसभा सदस्य वैभव थोरात यांनी शनिवारी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.