लोकशाही पुरस्कारांची घोषणा; शनिवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 02:33 AM2019-07-25T02:33:13+5:302019-07-25T02:33:20+5:30
उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव : निवडणुकीत लोकसहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांच्या कार्याचा गौरव
मुंबई : नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना राज्य निवडणूक आयोगाकडून ‘लोकशाही पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी २०१६ आणि २०१७ या वर्षांत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था, व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतील. विविध सहा गटांत एकूण १४ पुरस्कार प्रदान देण्यात येतील, असे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले.
मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये शनिवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुरस्कार सोहळा सुरू होईल. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार दिले जातील. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे
निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे - माथेरान हॉटेल असोसिएशन, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस, मुंबई विद्यापीठ, रिसोर्स अॅण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, संदीप भास्कर जाधव, सोलापूर.
निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे - डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली; दया अर्जुन डोईफोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, कराड आणि केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगर परिषद.
निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती - गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे.
निवडणूक प्रक्रियेत संगणक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन. मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे - मुंबई पालिका. निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर, मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ - ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.