अंतिम उमेदवारांची घोषणा विलंबाने
By admin | Published: April 3, 2015 03:09 AM2015-04-03T03:09:57+5:302015-04-03T03:09:57+5:30
पालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून तीन दिवसांमध्ये तब्बल १५८८ जणांनी अर्ज घेतले असून, आतापर्यंत फक्त पाच जणांनी नामांकन
नवी मुंबई : पालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून तीन दिवसांमध्ये तब्बल १५८८ जणांनी अर्ज घेतले असून, आतापर्यंत फक्त पाच जणांनी नामांकन अर्ज भरले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षाकडून शेवटच्या टप्प्यात अंतिम उमेदवार घोषित केले जाणार असून, शेवटच्या दोन दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत चार दिवस राहिली आहे. यानंतरही अद्याप प्रमुख राजकीय पक्षांनी सर्व प्रभागांमधील उमेदवारांची नावे घोषित केलेली नाहीत. राष्ट्रवादी व शिवसेनेची यादी जवळपास पूर्ण झालेली आहे. परंतु, या दोन्हीही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवारी घोषित केल्यास बंडखोरी होवून त्याचा फटका निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या प्रभागातील उमेदवारीविषयी मतभेद नाहीत त्यांची घोषणा केलेली आहे. बंडखोरी होण्याच्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. उमेदवारी मिळाली नाही तर आयत्या वेळी अपक्ष म्हणून लढायचे की इतर पक्षात जायचे याविषयी चाचपणी अनेकांनी सुरू केली आहे. ज्यांच्यावर अन्याय होणार त्यांनी दबक्या आवाजात आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. सर्वाधिक बंडखोरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपा व शिवसेनेची युती होणार का हेही अद्याप निश्चित झालेले नाही. काँगे्रस, शेकाप व इतर काही पक्षांनी सेना व राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने ३१ मार्चपासून अर्ज विक्रीस सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवशी ३०५ जणांनी अर्ज घेतले आहेत. तीन दिवसांमध्ये तब्बल १५८८ जणांनी अर्ज घेतले आहेत. काही प्रभागांमध्ये १० ते १५ अर्ज गेले आहेत. एकाच पक्षाच्या ४ ते ५ जणांनी अर्ज घेतले आहेत. यामधील पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी व भाजपाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश असून, इतर तिघांचा समावेश आहे. गुरुवारी महावीर जयंतीची सुटी असूनही महापालिकेने नामनिर्देशन अर्ज देण्यासाठी कार्यालय सुरू ठेवले होते. ५ एप्रिलला रविवार असल्यामुळे अर्ज स्वीकारण्यात व देण्यात येणार नाहीत. यामुळे आता अर्ज भरण्यासाठी चारच दिवस शिल्लक राहिले आहेत.