‘घोषणा सरकारची की घटक पक्षाची’, महामारीत श्रेयवाद वाईट; संजय निरुपम यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:03 AM2021-04-27T06:03:54+5:302021-04-27T06:40:40+5:30
संजय निरुपम यांचा राष्ट्रवादीला टोला
मुंबई : राज्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाच्या घोषणेवरून विरोधी नेत्यांसह सत्ताधारी काँग्रेस नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. मोफत लसीकरणासंदर्भातील घोषणा राज्य सरकारकडून होणे आवश्यक असताना राष्ट्रवादीकडून करण्यात आली. हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
निरुपम यांनी टि्वट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. ही बाब काहीशी खटकणारी आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण, त्याची घोषणा सरकार करणार? की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत श्रेय लाटण्याचे राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, असे सांगतानाच निरुपम यांनी ‘अभी ज़रा बाज़ आएँ’ अशी टीका केली.
‘वाटाघाटी’ आणि ‘टक्केवारीमुळे’ लोकहितासाठीचा निर्णय मागे घेऊ नये - पडळकर
भाजप नेत्यांनीही लसीकरणाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप केला आहे. मोफत लसीकरणाबाबतचे टि्वट मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलिट केल्याने भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण, तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटी’ आणि ‘टक्केवारीमुळे’ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
निर्णय त्वरित जाहीर करावा - भातखळकर
मोफत लसीकरणाचे श्रेय लाटण्यावरून ठाकरे सरकारच्या घटकपक्षात किळसवाणे राजकारण सुरू झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विट डिलीट करण्यावरून लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने त्वरित याबाबत मंत्रिमंडळात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर यांनी केली आहे.