येत्या २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: January 1, 2024 02:19 PM2024-01-01T14:19:41+5:302024-01-01T14:20:46+5:30

या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Declare a public holiday on January 22; MLA Atul Bhatkhalkar's demand to the Chief Minister | येत्या २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

येत्या २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 मुंबई : शतकानूशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवार,दि, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी दि,२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते व कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

 दि,२२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही  आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Declare a public holiday on January 22; MLA Atul Bhatkhalkar's demand to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.