Join us

शासन स्तरावर ‘पक्षी सप्ताह’ घोषित करा; पक्षीमित्र पर्यावरणमंत्र्यांना निवेदन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:13 AM

५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा.

सागर नेवरेकर मुंबई : अलिबाग येथील रेवदंड्यातील ३३व्या पक्षीमित्र संमेलनाचा समारोप करून, राज्यातील पक्षीमित्र एकत्रित येऊन मंत्रालयाला भेट देणार आहेत. शासन स्तरावर ‘पक्षी सप्ताह’ घोषित करा, अशी राज्यभरातील पक्षीमित्रांसह बहार नेचर फाउंडेशनची मागणी असून, या संदर्भातले एक निवेदन पर्यावरणमंत्र्यांना दिले जाणार आहे.

वर्धा-रेवदंडा-मुंबई असा ८५० किलोमीटर सायकल प्रवास करून, १४ जानेवारी रोजी सकाळी ११च्या दरम्यान पर्यावरणमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे. पक्षी हा निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असून, पर्यावरण साखळीतील त्यांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे. संकटग्रस्त पक्षी प्रजाती व त्यांच्या अधिवासाबद्दल जागृती निर्माण व्हावी. पक्षीसंवर्धन, संरक्षण व एकूणच निसर्गसाक्षरता वाढावी, या उद्देशाने राज्यात गेल्या तीन वर्षांपासून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. शासन स्तरावर ‘पक्षी सप्ताह’ घोषित झाल्यास पक्षी चळवळ वृद्धिंगत होईल, असा विश्वास पक्षीमित्रांना वाटत असल्याचे, महाराष्ट्र पक्षीमित्र (वर्धा) विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे यांनी सांगितले.

५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा. या संदर्भात एक निवेदन मंत्रालयात दिले जाणार आहे. ५ नोव्हेंबर हा पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा, तर १२ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन असतो. ही दोन्ही माणसे पक्षी विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी दोन ते तीन वर्षांपासून करत आहे, तसेच पाठपुरावादेखील करत असून, त्याचा एक भाग म्हणून निवेदन देणार आहोत, असेही भाष्य वीरखडे यांनी केले.