Join us  

दहा वर्षांपूर्वी हरवलेल्या पतीला मृत घोषित करा, पत्नीचा अर्ज दिवाणी न्यायालयाकडून मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:14 AM

सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय स्मिता यांचे पती जयरामन पुथनविथील १६ ऑगस्ट २०१३ रोजी लिबेरिया ते पोलंड दरम्यान जहाजावरून अचानक हरवले.

मुंबई : बोटीवर काम करणारा पती दहा वर्षापूर्वी हरवला असून, तो अद्याप न सापडल्याने त्याला मृत घोषित करा, अशी मागणी करत एका महिलेने शहर दिवाणी न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला असून, पतीला मृत घोषित केले आहे.

सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय स्मिता यांचे पती जयरामन पुथनविथील १६ ऑगस्ट २०१३ रोजी लिबेरिया ते पोलंड दरम्यान जहाजावरून अचानक हरवले. जहाजातील अधिकाऱ्यांनी तसे लेखी पत्रही स्मिता यांना दिले. याप्रकरणी स्मिता यांनी यलो गेट पोलिस ठाण्यात तक्रार केली. तपसाअंती पोलिसांनी तिचे पती सापडत नसल्याचे प्रमाणपत्र दिले. अनेक वर्षे उलटूनही पतीचा शोध न लागल्याने स्मिता यांनी पतीला मृत घोषित करण्याची मागणी करत शहर दिवाणी न्यायालयात याचिका केली.

या याचिकेला मुंबई महापालिकेच्या वतीने विरोध करण्यात आला. मात्र ती व्यक्ती जिवंत असल्याचा दावा कोणीही केलेला नाही इतकेच काय तर इतर पक्षकारदेखील ती व्यक्ती जिवंत असल्याचे सांगू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली.

टॅग्स :न्यायालय