मुंबई : दिंडोशीचा डोंगर वन विभाग म्हणून जाहीर करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गोरेगाव पूर्व नागरी निवारा मागील म्हाडा वसाहतींच्या संरक्षक भिंतीपलिकडे दिंडोशी डोंगरावरून वाहणाऱ्या वलभट नदीचा परिसर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येणारा आणि पूर्वी घनदाट वृक्षवल्लीने भरलेला डोंगर विकासकाच्या वृक्षतोडीने आता भकास झाला आहे. गेली १८ वर्ष हा डोंगर आगीने होरपळत आहे. अजूनही निसर्गाचा डोंगर कड्यावरून वाहणारा धबधबा व खळखळत आवाज करत वाहणारी वलभट नदी डोळ्यांचे पारणे फेडते. विविध पक्षी येथे दिसून येतात. बिबटे, सांभर, बारशिंगे, हरणे या परिसरात पाहायला मिळतात. पर्यावरणप्रेमी सरकार व मुंबईकर याकडे लक्ष केव्हा देणार, असा प्रश्न साद-प्रतिसादचे संस्थापक संदीप सावंत यांनी विचारला आहे.
दिंडोशीचा डोंगर वन विभाग म्हणून जाहीर करावा, अशी मागणी साद-प्रतिसाद व युवा स्वराज्य संस्था तसेच स्थानिक पर्यावरणवादी नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ‘आरे वाचवा’सारखी ‘दिंडोशी डोंगर वाचवा’ ही चळवळ उभी करावी लागेल, असे पर्यावरण व प्राणीमित्र संदीप सावंत यांनी सांगितले.
दिंडोशीचा डोंगर व नागरी धबधबा वाचविण्यासाठी मुंबईकरांना ‘आरे वाचवा’सारखी चळवळ उभी करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे साद घालत आहे, असे संदीप सावंत यांनी सांगितले.
---------------------------------