Join us

२२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 8:18 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे.

मुंबई - अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत असून देशभर रामभक्तांकडून हा दिव्य सोहळा साजरा केला जाईल. त्यासाठी, स्थानिक पातळीवरही भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन विविध योजना आखल्या आहेत. तर, अयोध्येत या सोहळ्यासाठी तब्बल १७ लाख भाविकांचा मेळा जमणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येला जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. तर, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनीही २२ जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन मराठीजनांना केलं आहे. आता, त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना पत्र लिहून २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, राज्यात दारु व मासविक्रीला त्या दिवशी बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे, आता २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी अन् ड्राय डे जाहीर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

भाजपचे आमदार व कौशल्य, रोजगार, उद्याजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

२२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, ही सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्यामुळे, राज्यात सुट्टी जाहीर करुन महाराष्ट्रात सार्वजनिक दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणी मंत्री लोढा यांनी केली आहे. 

आमदार राम कदम यांचीही मागणी

घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. अयोध्येमध्ये पाचशे वर्षांनंतर राममूर्तीची प्रतिष्ठापना होत असून हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करावी, अशी मागणी राम कदम यांनी पत्रात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, असेही कदम यांनी पत्रात नमुद केले आहे. 

टॅग्स :मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेराम मंदिरअयोध्या