Join us

मेहुल चोक्सीला फरार घोषित करा; सीबीआयची न्यायालयात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:40 AM

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंदविण्यापूर्वीच मेहुल चोक्सीने देश सोडला.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याने अजामीनपात्र वॉरंटला उत्तर न दिल्याने त्याला फरार म्हणून घोषित करा, अशी मागणी सीबीआयने विशेष न्यायालयाला केली.पीएनबी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंदविण्यापूर्वीच मेहुल चोक्सीने देश सोडला. त्याने न्यायालयाने बजाविलेले वॉरंट अंमलात आणता येऊ नये, यासाठी अँटीग्वोचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले.चोक्सीने त्याच्यावर बजाविलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जाला सीबीआयने विरोध केला. ‘आरोपी फरार आहे आणि त्याची चौकशी करण्याचा आम्हाला अधिकार आहे,’ असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. न्यालयालयाने पुढील सुनावणी १७ आॅक्टोबर रोजी ठेवली.चोक्सीला फरार घोषित करावे. त्यामुळे फौजदारी दंडसंहितेअंतर्गत (सीआरपीसी) त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली.सीआरपीसी कलम ८३ अंतर्गत आरोपीला फरार म्हणून घोषित केल्यानंतर न्यायालय त्या आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश देऊ शकते.१३,००० कोटींची फसवणूक केल्याचा आरोपएका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडचे मालक असलेला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची १३,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी बनावट लेटर्स आॅफ अंडरटेकिंग घेऊन बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी व मेहुल चोक्सी देश सोडून फरार झाले.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा