निवासी डॉक्टरांना आयएमएस कॅडर म्हणून घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:57+5:302021-05-07T04:06:57+5:30
पंतप्रधान माेदी यांच्याकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाच्या संसर्गाचा कहर कायम आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा ...
पंतप्रधान माेदी यांच्याकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाच्या संसर्गाचा कहर कायम आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी आयएएस, आयपीएस, आयएफएसच्या धर्तीवर आयएमएस अर्थात इंडियन मेडिकल सर्व्हिस कॅडर तयार करावे. त्यानुसार महत्त्वाच्या सर्व वैद्यकीय पदांवर आयएमएसची नियुक्ती करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संघटनांनी केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या पदावर बिगर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असल्याने हा गोंधळ उडाल्याचे निवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी आयएमएस कॅडरची मागणी उचलून धरली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी यासंबंधी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, तर मुरलीधर कमिटीच्या शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देशपातळीवर सर्व संघटना यासाठी पाठपुरावा करत आहेत.
* ट्विटर #IndianMedicalServices ट्रेंड कायम
आयएमएस कॅडरची मागणी मान्य व्हावी, यासाठी डॉक्टरांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे, तर सोशल मीडियावरही जनजागृती सुरू आहे. त्यानुसार देशभरातील निवासी डॉक्टरांनी #IndianMedicalServices ट्रेंड चालवला. अवघ्या एका तासात १८००० हून अधिक ट्विटचा पाऊस पडला.
* प्रस्ताव धूळखात
वैद्यकीय क्षेत्राचा कारभार वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीकडेच असावा, अशी मागणी करत आयएमएस कॅडर निर्माण करावे, अशी शिफारस १९६१मध्ये करण्यात आली होती. मुरलीधर समितीने ही शिफारस केली. पण, या शिफारसीकडे ७० वर्षांत कुठल्याच सरकारने लक्ष दिले नाही. शिफारस धूळखात आहे. दरम्यान, २०१७मध्ये डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी संसदेत याची मागणी करत तसा प्रस्ताव ठेवला. मात्र, केंद्राकडे हा प्रस्ताव धूळखात आहे.
.............................