हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 06:45 IST2025-03-28T06:44:47+5:302025-03-28T06:45:30+5:30
"सरकारचे अपयश लपवणारे हे अधिवेशन होते"

हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे ‘सौगात ए मोदी’ हा कार्यक्रम. ३२ लाख कुटुंबांच्या घरोघरी जाऊन भाजप कार्यकर्ते सौगात म्हणजेच भेट देणार आहेत. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. म्हणून भाजपने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर शिवसेना भवनात ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे सचिव विनायक राऊत, नेते अनिल परब, आ. मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी ज्या थापा मारल्या त्याबद्दल कुणीही वाच्यता केली नाही. सरकारचे अपयश लपवणारे हे अधिवेशन होते, अशी टीका ठाकरे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. बीडच्या सरपंचांची हत्या, सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा, नागपूरमधील जातीय दंगल यापैकी कोणत्याच घटनेबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. कर्जमाफी, लाडक्या बहिणींना पैसे वाढविण्याचे निर्णय घेतले नाहीत. सरकारने केलेला १०० दिवसांचा संकल्प कुठेच दिसला नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा
सरकारने दिलेली सगळी आश्वासने फोल ठरली आहेत. सत्तेत आल्यावर दडपशाही सुरू झाली आहे. राज्य सरकारचा माज अधिवेशनात बघायला मिळाला. सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणला गेलेले अलीकडच्या काळातले हे पहिलेच अधिवेशन असावे. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा अशी सरकारची स्थिती झाली आहे, असे टीकास्त्र ठाकरेंनी सोडले.