तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:32 PM2024-08-16T12:32:31+5:302024-08-16T12:35:52+5:30

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Declare the face of mva Chief Ministership Uddhav Thackerays appeal to sharad Pawar and prithviraj chavan | तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

Uddhav Thackeray ( Marathi News ) : "आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो... इथं शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. कारण मुळात मी माझ्यासाठी लढत नाही. जेव्हा मी मुख्यमंत्रिपद सोडलं, त्यानंतरही मी जो लढतोय तो स्वत:च्या स्वार्थासाठी लढत नाही. मी महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत कोणातही नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो कोणी हिंमत करतो, त्याला आम्ही गाडून टाकतो, या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे," असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे. ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच भाषण करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. "मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर न करता आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर आपआपसांत पाडापाडी केली जाते, असा आमचा युतीमधील अनुभव आहे. कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मु्ख्यमंत्री, असं म्हटलं की दुसऱ्या पक्षाच्या जास्त जागा येऊ नये म्हणून पाडापाडी केली जाते, त्यामुळे कोणालाही करा पण मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

"ही निवडणूक महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्याची"

सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत आहे. माझं तर म्हणणं आहे आजच महाराष्ट्राचीही निवडणूक जाहीर करून टाका. निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तयारी आहे, असं बोलायला खूप सोपंय, पण वाटते तितकी ही लढाई सोपी नाही. आपण लोकसभा निवडणुकीत राजकीय शत्रूला पाणी पाजलंच आहे. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची निवडणूक होती. आताची लढाई ही महाराष्ट्रधर्म रक्षणाची आहे, महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. मागे मी कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर अशी लढायची की एक तर तू राहशील किंवा मी राहील. मात्र हे आपल्यातली आपल्यातच नको. नाहीतर मित्रपक्षच एकमेकांना म्हणतील एक तर मी राहील किंवा तू राहशील. हे वाक्य जे महाराष्ट्र लुटायला आलेत त्यांच्यासाठी आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Web Title: Declare the face of mva Chief Ministership Uddhav Thackerays appeal to sharad Pawar and prithviraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.