मुंबई : बँकांचे कर्ज बुडवून सध्या लंडनला राहत असलेल्या विजय मल्ल्याला फरारी घोषित करा आणि त्याची १२ हजार ५०० कोटींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी द्या, असा अर्ज सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात शुक्रवारी केला.आर्थिक घोटाळे करून किंवा कर्ज बुडवून देशाबाहेर फरार झालेल्यांसंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या नव्या कायद्यानुसार, ईडीने मल्ल्याला फरारी घोषित करून, त्याची १२ हजार ५०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.आधीच्या प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्टनुसार, खटला संपल्यानंतर ईडी दोषीची मालमत्ता जप्त करू शकत होते. खटला संपण्यास वर्षानुवर्षे लागत असल्याने आरोपीचे चांगलेच फावत होते. मात्र, सुधारित कायद्यानुसार, देशाबाहेर फरार झालेल्या आरोपींवर खटला सुरू होण्यापूर्वीच फरारी घोषित करून, त्याची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते.ईडीने दोनच दिवसांपूर्वी माल्ल्यावर दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे, तर गेल्या वर्षी पहिले आरोपपत्र दाखल केले. ईडीने अर्जात म्हटले आहे की, कर्ज परत करण्याचा मल्ल्याचा विचार नाही. त्यामुळे त्याच्या सर्व मालमत्ता विकून कर्ज फेडता येईल. मल्ल्या व त्याच्या फर्म्सनी कट रचून बँकांना फसविले आहे. त्यांनी सर्व प्रक्रिया डावलून कर्ज मिळविले आहे. पीएमएलएअंतर्गत केलेल्या तपासानुसार, मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे कर्ज घेऊन, ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. पीएमएलएअंतर्गत आत्तापर्यंत मल्ल्याची ८ हजार ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
विजय माल्ल्याला फरार घोषित करा, ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:58 AM