लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत ७४ नवीन महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव शनिवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत मांडण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या बृहत आराखड्यांतर्गत यंदाची ४४ नवीन आणि मागील वर्षाची ३० अशी एकूण ७४ महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
मात्र, मागील वर्षी महाविद्यालयांच्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये मुंबई व उपनगरात १३. ६ टक्क्यांची घट झालेली असताना नवीन महाविद्यालयांचा घाट कशासाठी, असा प्रश्न विचारत सिनेट सदस्यांकडून प्रस्तावाला विरोध करण्यात आला.
२०१८ च्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार बृहत आराखड्यांतर्गत नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव मांडताना संबंधित तालुका, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम, कौशल्ये, भौगोलिक परिस्थिती, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्या बाबींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे सर्वेक्षण विद्यापीठाकडून झाले असल्यास त्यातील माहिती सिनेट सदस्यांपुढे मांडणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून ते करण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया सिनेट सदस्य प्रा. गुलाबराव राजे यांनी दिली.
तसेच विद्यापीठांतर्गत असणाऱ्या एकूण महाविद्यालयांच्या ५ टक्के महाविद्यालयांना परवानगी देण्याची तरतूद ही कायद्यात असताना यंदा केली गेलेली प्रस्तावित महाविद्यालयांची वाढ ही १२ टक्के असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई विद्यापीठ सार्वजनिक विद्यापीठातील कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचा दावा त्यांनी केला.
महाविद्यालयांतील प्रवेशांमध्ये होणारी घट चिंतेची बाब असताना नवीन महाविद्यालयांना परवानगी देणे गरजेचे नसल्याची भूमिका बुकटुक आणि इतर सिनेट सदस्यांनी घेतली असल्याने मुंबई विद्यापीठ याबाबतीत काय निर्णय घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पदवी प्रवेशात घट
शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ ची तुलना केली असता मुंबई आणि मुंबई उपनगराच्या महाविद्यालयांतील महत्त्वाच्या अभ्यासक्रमात प्रवेशाची मोठी घट दिसून आली आहे. मुंबई शहरातील कला शाखेच्या प्रवेशात १५. ३ टक्के तर वाणिज्य शाखेच्या प्रवेशात १५.८ टक्के घट दिसून आली. कला शाखेच्या प्रवेशांत ही घट १५. ३ टक्क्यांची होती. याचप्रमाणे मुंबई उपनगरात महाविद्यालयातही या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात घट दिसून आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही अभ्यासक्रमांची मिळून ही घट १२ टक्क्यांची आहे. दरम्यान, यंदाच्या प्रवेशावर किती परिणाम होणार आहे, त्याची माहिती पदवी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळू शकणार आहे.
-------------
बृहत आराखड्यात मुंबई विद्यापीठांतर्गत प्रस्तावित महाविद्यालये
मुंबई -५
मुंबई उपनगर - १२
ठाणे १८
रायगड -१०
रत्नागिरी १३
सिंधुदुर्ग- ७
पालघर -९
एकूण - ७४
-----
मुंबई जिल्हा
प्रवेश नोंदणी - २०१९-२० - २०२०-२१ - फरक - घट
प्रथम वर्ष विज्ञान - ५५६६-४८७८- -६९८- १२. ४%
प्रथम वर्ष कला - ६९८१-५९१३- -१०६८- १५. ३%
प्रथम वर्ष वाणिज्य - २६४६१- २२२८२- ४१७९- १५. ८%
मुंबई उपनगर जिल्हा
प्रवेश नोंदणी - २०१९-२० - २०२०-२१ - फरक - घट
प्रथम वर्ष विज्ञान - १८६३- १८००- -६३- ३. ४ %
प्रथम वर्ष कला २८०२- २६१८- -१८३ - ६. ६ %
प्रथम वर्ष वाणिज्य - २३७४५- २०५९४- -३१५१- १३ . ३%