मासे विक्री व्यवसायाला उतरती कळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:38 AM2018-10-21T02:38:02+5:302018-10-21T02:38:10+5:30
परप्रांतीयांनी अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने ग्रँट रोड येथील मासळी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
मुंंबई : परप्रांतीयांनी अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने ग्रँट रोड येथील मासळी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, मुंबईचे आद्य रहिवासी असणाऱ्या आगरी-कोळी बांधवांच्या मासे विक्री व्यवसायाला उतरती कळा लागेल, अशी भीती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही वर्षांपासून मासेमारी व्यवसायात आणि मासेविक्रीमध्ये परप्रांतीयांची घुसखोरी वाढली आहे. मासेमारी आणि मासे विक्री आगरी-कोळ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्याच्या घडीला बहुतांश आगरी-कोळी बांधवांचे मासेमारी, मासे विक्री उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे परप्रांतीय मासेविक्रेत्यांमुळे व्यवसाय होत नसल्याने काही समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
परप्रांतीय अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्री करतात. त्यामुळे मासळी बाजारात ग्राहक कमी संख्येने येतात. ग्राहक नसल्याने मासे विक्रेत्यांचा व्यवसाय होत नसून मंदीची लाट आली आहे. काही वेळेला ३ ते ४ हजारांचा माल फेकून देण्याची वेळ येते. आधी दररोज ५०० ते ६०० रुपये मिळत असत, मात्र आता १०० ते २०० रुपये धंदा होत नसल्याचे मासे विक्रेता महिलांनी सांगितले. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटनीस प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले की, परप्रांतीय शिळा झालेला माल स्वस्तात विकत आहेत. परप्रांतीय अस्वच्छ कपडे, अस्वच्छ हाताने मासे विक्री करतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो. याउलट मुंबईचे मूळचे मासे विक्रेते समुद्रातील पकडलेले ताजे मासे विकतात. त्यामुळे मुंबई महापालिकेने अनधिकृतरीत्या मासे विकणाºयांवर कारवाई करावी.
७० वर्षांपासून ग्रँट रोड येथे मासळी बाजार आहे. सध्या मासळी बाजारात ९० ते १०० आगरी-कोळी महिला मासे विक्रीसाठी बसतात. एकूण १९८ महिलांसाठी बसण्याची जागा बाजारात आहे. मात्र व्यवसाय होत नसल्याने काही महिला बाजारात मासे विकण्यासाठी बसत नाहीत.
मासळी बाजारात प्राथमिक सोयीसुविधा नाहीत. विद्युत दिवे, पंखे यांची व्यवस्था नीट नाही. स्वच्छता नाही, सुरक्षितता नाही. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी मासे विक्रेता महिलांनी केली आहे.
>मासळी बाजारात सोयीसुविधांचा अभाव