मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक अन्यत्र उभारण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नाही. कालच्या दुर्घटनेनंतर स्मारकाची जागा बदलण्याची मागणी होत असली तरी स्मारक आहे त्याच जागेवर उभारण्यावर सरकार ठाम आहे.स्मारक उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे आणि त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता अन्यत्र स्मारक उभारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. राज्य सरकार वा प्रशासनाच्या पातळीवर स्मारकाची जागा बदलण्याची कुठलीही चर्चा नाही. स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.कालच्या दुर्घटनेला स्मारक पाहण्यासाठी भविष्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेशी जोडणे योग्य होणार नाही. कारण, स्मारकाची उभारणी होत असतानाच पर्यटकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची सक्षम यंत्रणाही उभारली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी स्पष्ट केले.>भूमिका स्पष्ट करणारअरबी समुद्रातील स्मारकाचे कंत्राट देताना घोटाळे झाल्याचा आरोप स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या एका पत्राचा संदर्भ देऊन विरोधकांनी केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, हे कंत्राट देताना अवलंबिलेली पद्धत किती पारदर्शक होती हे ठासून सांगण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी ठेवली असून त्या बाबत ते एक दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहेत.
जागेत बदल करण्यास सरकारने दिला नकार, काम जलद पूर्ण करा
By यदू जोशी | Published: October 26, 2018 4:20 AM