मुंबईत मागील काही दिवसांमध्ये घर खरेदीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:48+5:302021-05-14T04:06:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाच्या मे महिन्यात सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत घर खरेदीला नागरिकांचा अत्यंत कमी प्रतिसाद पाहायला ...

Decline in home buying in Mumbai in last few days | मुंबईत मागील काही दिवसांमध्ये घर खरेदीत घट

मुंबईत मागील काही दिवसांमध्ये घर खरेदीत घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाच्या मे महिन्यात सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत घर खरेदीला नागरिकांचा अत्यंत कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या महिन्यात ११ मेपर्यंत मुंबईत १४२६ घरांच्या खरेदीची नोंद झाली आहे. मागील काही महिन्यांमध्ये झालेली घर खरेदी पाहता ही घर खरेदी अत्यंत कमी दिसून येत आहे. मागच्या महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये तीन हजार घरांची खरेदी झाली होती. मात्र, या महिन्यात सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच घर खरेदीचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

मागील वर्षी राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी झळ बसली. रिअल इस्टेट क्षेत्राला राज्यात पुन्हा एकदा चालना मिळावी यासाठी शासनाने मुद्रांक शुल्क नोंदणीमध्ये तीन टक्के सवलत दिली. सप्टेंबर ते डिसेंबर ३ टक्के व जानेवारी ते मार्च २ टक्के अशा स्वरूपात ही सवलत देण्यात आली होती. यामुळे या काळात प्रति महिना सरासरी १० हजार घरांची खरेदी झाली. मार्च महिना हा मुद्रांक शुल्क सवलतीचा शेवटचा महिना असल्याने अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात घर खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील घर खरेदीची कार्यालयेदेखील बंद आहेत. त्याच प्रमाणे मुद्रांक शुल्क सवलतीचा कालावधी मार्च महिन्यात संपल्याने घर खरेदीला नागरिक कमी प्रतिसाद देत आहेत. परिणामी, मे महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच कमी प्रमाणात घर खरेदी झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

...........................

Web Title: Decline in home buying in Mumbai in last few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.