सलग दुसऱ्या पंधरावड्यात विमान इंधनदरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:07 AM2021-04-20T04:07:20+5:302021-04-20T04:07:20+5:30
मुंबई : विमान इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्युएल) दरात सलग दुसऱ्या पंधरवड्यात घट नोंदविण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या काळात सर्वाधिक तोट्यात ...
मुंबई : विमान इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्युएल) दरात सलग दुसऱ्या पंधरवड्यात घट नोंदविण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या काळात सर्वाधिक तोट्यात असलेल्या हवाई क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला.
गेल्या सहा महिन्यांपासून विमान इंधनदराचा आलेख चढाच होता. मुंबईत ऑक्टोबर, २०२० मध्ये ३९ हजार १४७ प्रति किलोलीटर असलेले एटीएफचे दर मार्च, २०२१ मध्ये ५७ हजार ५१९ वर पोहोचले. म्हणजे त्यात तब्बल ३८ टक्के वाढ झाली. त्यामुळे कोरोनाच्या काळात प्रवासी संख्या रोडावल्याने आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांचे कंबरडे मोडून पडले. मात्र, एप्रिलमध्ये सलग दुसऱ्या पंधरावड्यात विमान इंधनदरात घट नोंदविण्यात आल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत विमान इंधनाचे दर ५६,४७९, तर १९ एप्रिल रोजी ५५,९१० इतके नोंदविण्यात आले आहे.
विमान इंधननाचे दर तिकिटावर सर्वाधिक प्रभाव पाडतात. गेल्या काही महिन्यांत इंधन महागल्याने विमान कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलती कमी झाल्या होत्या. आता इंधन दरात घट झाल्यामुळे सवलतींचे प्रमाण वाढेल, शिवाय तिकिटांच्या किमतीही कमी होतील, अशी अपेक्षा वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.
...............................