मुंबई : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातच आता मुंबईतील भाडेकरारांमध्येदेखील घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे मुंबईतील अनेक कार्यालये बंद आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. तर लोकल प्रवासावरदेखील अद्याप निर्बंध कायम आहेत. त्यामुळे मुंबईत भाड्याने घर घेऊन राहणारे तसेच भाड्याने कार्यालय चालवणाऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे.
स्क्वेअर फिट इंडियाच्या अहवालानुसार, २०२१च्या एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत मुंबईत ४२ हजार ४६८ भाडे करार झाले. २०१९ मध्ये ६९ हजार ५३६ भाडे करार झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षी भाडे करार कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० च्या एप्रिल, मे, जूनमध्ये कडक लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प होते. परिणामी, अनेक भाडेकरार रद्द झाले होते; तसेच भाडेकरार नव्याने बनविणेदेखील थांबले होते. तरीदेखील २०२० मध्ये ९६५३ भाडे करार झाले. आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरीदेखील भाडे करारांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
२०२१ च्या जून महिन्यात एकूण १९ हजार २१ लिव्ह आणि लायसन्स करारांची नोंद झाली. तर यापूर्वी २०१९ च्या जून महिन्यात एकूण २२ हजार ९७४ लिव्ह आणि लायसन्स करारांची नोंद झाली होती.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे मुंबई शहरातील भाडेकरारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबई शहरात शिक्षणासाठी देशातील विविध राज्यांमधून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. हे विद्यार्थी मुंबईत भाड्याचे घर घेऊन राहतात. मात्र कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने हे विद्यार्थी मुंबई सोडून आपापल्या राज्यात परतले आहेत. त्याचप्रमाणे अनेक कामगारदेखील मुंबईतून आपापल्या राज्यात गेले आहेत. मुंबईतील वांद्रे, दक्षिण मुंबई या परिसरांमध्ये अनेक परदेशी नागरिकदेखील भाड्याच्या घरांमध्ये राहतात; मात्र तेदेखील कोरोनामुळे आपापल्या देशातच राहत आहेत. त्यामुळे सध्या मुंबई शहरात भाडे करार कमी झाले.