Join us

सप्टेंबर महिन्यात राज्यातील चाचण्यांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात जुलै महिन्यात आठवड्याला दोन लाखाच्या घरात कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. सप्टेंबर महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात जुलै महिन्यात आठवड्याला दोन लाखाच्या घरात कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. सप्टेंबर महिन्यात यात घट होऊन आठवड्याला होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण १ लाख १९ हजारावर आले आहे. कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याचे निर्देश असतानादेखील अकोला, बुलडाणा, धुळे, हिंगोली, नांदेड, नंदूरबार आणि यवतमाळ जिल्ह्यात १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान सहा हजाराहून कमी चाचण्या करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, चाचण्या वाढविण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार आदेश देण्यात आले आहेत. काही जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या तुलनेत अँटिजन चाचण्या अधिक करण्यात येत आहेत. याखेरीज, रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान ११ लाख ४७ हजार ९४६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ६ लाख ९ हजार २०७ आरटीपीसीआर, तर ५ लाख ३८ हजार ७३९ अँटिजन चाचण्या होत्या. या कालावधीत मुंबईत २ लाख ७६ हजार २६७, तर पुण्यात १ लाख २५ हजार ६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात केवळ १ लाख ६७ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, सक्रिय रुग्णांचा आलेख घसरतो आहे, त्याच्या विश्लेषणासाठी आणखी एक आठवडा संख्या तपासावी लागेल. सण, उत्सव आणि पावसानंतर आता रुग्णसंख्येत घट होते की वाढते, यावर तज्ज्ञांची नजर आहे. मात्र दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण कमी होता कामा नये, त्याकरिता कठोरपणे पावले उचलून चाचण्या वाढविण्याची गरज आहे.

कालावधी १५ ते २१ सप्टेंबर

जिल्हा चाचण्या

नंदूरबार १०३९

हिंगोली २७८८

अकोला ३००२

धुळे ४४२१

नांदेड ५४८२

यवतमाळ ४६७७

बुलडाणा ५५७८

चाचण्यांचे प्रमाण वाढविलेले जिल्हे

उस्मानाबाद ११२६६

पालघर १२२६०

परभणी ७८२७