पर्यावरण तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, राजकीय असमर्थतता आणि उद्योग जगताचा स्वार्थ यामुळे वने आणि वन्यजीवांचा ऱ्हास हाेत आहे. गाव - शहरातील पशु-पक्षी कमी झाले आहेत. त्यामुळे जे व्हायरस या प्राण्यांच्या शरीरात वाढत होते त्यांना आता होस्ट (प्राणी-पक्षी) राहिले नाहीत आणि म्हणून त्यांनी मानवाला आपली शिकार करणे सुरू केले. यातूनच सार्स, पोलिओ, इबोला, कोविडसारखे रोग होऊन गेले. वन्य जीवांचा ऱ्हास झाल्याने पशु-पक्ष्यांचे रोग मानवाला होऊ लागले. आजचा कोरोना विषाणू हा त्यातीलच असून भविष्यात कोणता विषाणू - जीवाणू येईल, हे सांगता येत नाही, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली.
पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, कोरोनाची साथ आणि महामारी हे वाढत्या मानवी लोकसंख्येचे कारण आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण इतर सशक्त प्राण्यांपेक्षा वरचढ झालो. शेती, उद्योग आणि स्वत:च्या विकासाचाच विचार करून आपण प्राण्याचे जंगल तोडून विकास कामे केली. वने, वन्यजीव आणि नैसर्गिक संसाधनांना नष्ट करू लागलो. सजीवांचा व्यापार करू लागलो. त्यांचा आहार म्हणून वापर करू लागलो. यातून वन आणि वन्यजीवांचे प्रमाण अत्याधिक कमी होऊन मानवांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कुठल्याही एका प्रजातीची संख्या वाढणे हे निसर्गाला अपेक्षित नसते. जर वाढली तर निसर्ग त्या संख्येला विविध प्रकाराने आळा घालतो, महामारीच्या रूपाने, नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने मग ही वाढती संख्या कमी होते.
आता उपाययोजना म्हणूनच नैसर्गिक साधनसंपतीचे जतन केले पाहिजे. प्राणवायू, पाणी, अन्न अशा ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या प्रदूषित करून त्याचा सुरू असलेला व्यवसाय थांबवला पाहिजे. स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि शुद्ध प्राणवायू मिळाला पाहिजे. जीवनाला आवश्यक असलेले जंगल, पशु-पक्षी यांचे संरक्षण आणि संख्यावाढ प्राधान्याने व्हायला पाहिजे. शहरात सर्वत्र वृक्ष लागवड करणे, हवा-पाणी प्रदूषण कमी करणे, आपले विलासी, जीवन कमी करून निसर्गपूरक जीवनमान जगायला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आहारात जास्त प्रमाणात फळे, पालेभाज्या आणि अत्यल्प मांसाहार केला पाहिजे. आपल्या परिसरात जंगलसदृश परिस्थिती नक्कीच निर्माण केली पाहिजे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण हे बदल करण्याचा निर्धार केला पाहिजे, असे आवाहन चोपणे यांनी केले.
* सूक्ष्म जीवांचे जग
जीवाणू
सजीव विकासाच्या सुरुवातीला सर्वच जीव हे एकपेशीय आणि विषाणूच होते. पुढे सुरक्षा आणि आहार मिळविण्यासाठी एकपेशीय जीवांनी बहुपेशीय रूप विकसित केले. आज ब्ल्यू व्हेल, हत्ती आणि मानव या सर्वांचे शरीर जरी मोठे झाले तरी सर्व प्राण्यांच्या जीवनाचे मूळ स्वरूप एकपेशीयच आहे. आपणसुद्धा एकपेशीय जीवच आहोत. सर्व जीव जगण्यासाठी आणि प्रजोत्पनासाठी धडपडत असतात. जीवाणूमध्ये बॅक्टेरिया, प्रोटोंझुआ, यीस्ट, अलजी, आणि आर्किया या एकपेशीय जीवाणूचा समावेश असून त्या स्वतंत्रपणे किंवा इतरांच्या शरीरात जगतात, प्रजनन करू शकतात. त्यामुळे रोग होतात. परंतु काही जीवाणूंच्या अनेक प्रजाती आपल्या शरीरात जगून आपल्याला मदत करतात. असे करोडो जीवाणू प्रत्येकांच्या शरीरात असताच.
विषाणू
विषाणू मात्र वेगळे आहेत. इन्फ्लुएन्झा डेंग्यू, रोटावायरस, सार्स कोविड, मर्स, चिकनगुनिया, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, इबोला, झिका, एचआयव्ही, मार्बर्ग, हंता, रेब्बीस, स्मालपॉक्स हे धोकादायक विषाणू आपण अनुभवले आहेत. ते प्रोटीनने वेढलेले जनुकीय पदार्थ असतात. त्यांना प्रजनन आणि विकास करण्यासाठी इतर जीवांच्या पेशी किंवा शरीराची आवश्यकता असते. म्हणूनच विषाणू जगण्यासाठी मानव, प्राणी, पशू, पक्षी सजीवांच्या शोधात असतात. ते गरजेप्रमाणे सतत स्वत:मध्ये बदल करून टिकाव धरण्याचा प्रयत्न करीत असतात. ही सूक्ष्म जीवांची लढाई असून जो जिंकला तो टिकला, हा निसर्गाचा नियम आहे.
..................................