मुंबई : मुंबईतील प्रमुख शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत २०२१ मध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे, तर प्रीमियम घरांच्या विक्रीत तुलनेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता बांधकाम व्यावसायिक परवडणाऱ्या घरांच्या ऐवजी प्रीमियम घरांच्या निर्मितीवर भर देत आहेत. भारतातील प्रमुख शहरांमध्ये २०२१ मध्ये ८० लाख ते १.५ करोड किमतीच्या १३ हजार १३० घरांची विक्री झाली, तर ४० लाख ते ८० लाखदरम्यान किंमत असणाऱ्या ११ हजार ७६० घरांची विक्री झाली. यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ३६ टक्के प्रीमियम घरे विक्रीसाठी बाजारात आणली आहेत तर २० टक्के परवडणारी घरे बाजारात आणली आहेत. अनारॉक संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
बांधकाम व्यवसायिकांनी २०१९ मध्ये ४० टक्के परवडणारी घरे बाजारात विक्रीसाठी आणली होती. २०२० मध्ये ३० टक्के घरे विक्रीसाठी आणली होती, तर आता २०२१ मध्ये २० टक्के घरे विक्रीसाठी आणली आहेत. कोरोनामुळे परवडणाऱ्या घरांच्या विक्रीवर हा परिणाम झाला असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अनुज पुरी यांनी सांगितले की, भारतातील हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये ७२ टक्के प्रीमियम घरे विक्रीसाठी आहेत तर दिल्ली एनसीआर आणि मुंबई महानगर क्षेत्रात ५२ टक्के घरे बाजारात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या काळात घर खरेदीचा ट्रेंड हा परवडणाऱ्या घरांपेक्षा प्रीमियम आणि लक्झरी घरांकडे जास्त दिसून आला. या काळात लोकांनी जास्त जागा व सुटसुटीत असलेल्या घरांना पसंती दर्शविली. तसेच या काळात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांनादेखील परवडणारी घरे उपलब्ध करणे कठीण झाले. यामुळे बाजारात प्रीमियम व लक्झरी घरांची उपलब्धता वाढली.